सांगली : महापालिका मुख्यालयालगतच्या प्रतापसिंह उद्यानाजवळील अग्निशमन दलाचे कार्यालय व यांत्रिक विभाग स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या जागेवर बीओटीतून व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घातल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. यापूर्वीही या जागेवर बीओटीचा प्रस्ताव आला होता, पण विरोधामुळे तो बारगळला होता.महापालिकेच्या स्थायी समिती सभेत गुरुवारी अग्निशमन दल व यांत्रिक विभाग इतरत्र हलविण्यावर चर्चा झाली. काँग्रेसचे नगरसेवक हारूण शिकलगार व स्वाभिमानी आघाडीच्या अश्विनी खंडागळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. प्रतापसिंह उद्यानालगतच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. मुख्य शहरात आगीच्या घटना घडल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचता यावे, यासाठी तत्कालीन सांगली नगरपालिकेने या जागेवर अग्निशमन दलाचे कार्यालय सुरू केले आहे. यालगतच महापालिकेचा यांत्रिक विभागही आहे. पालिकेची वाहने दुरुस्तीचे कामही तेथून चालते. अग्निशमन दलासाठी ही जागा अपुरी आहे. शंभरफुटी रस्त्यावरील कत्तलखाना परिसरात महापालिकेने अग्निशमन दल व यांत्रिक विभागासाठी दोन एकर जागा आरक्षित केली आहे. ही जागा विकसित करून दोन्ही हे विभाग तेथे स्थलांतरित करावेत, अशी मागणी शिकलगार व खंडागळे यांनी केली. या जागेची पाहणी करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जागा मोकळी करण्यात येणार आहे. त्यामागे सत्ताधाऱ्यांचा बीओटीचा घाट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृह, जयश्री टॉकीजजवळील पार्किंगची जागा या दोन्ही ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय झाला आहे. लवकरच महासभेत त्याला मान्यताही घेतली जाईल. या दोन्ही जागांसोबतच अग्निशमन दलाच्या जागेचाही त्यात समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सात ते आठ वर्षापूर्वी शहरात चार ठिकाणी बीओटी प्रकल्प झाले. तेव्हाही या जागेत बीओटीचा विचार झाला होता. पण बीओटीचे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने या जागेवरील प्रस्ताव मागे पडला होता. आता पुन्हा अग्निशमन दलाच्या जागेवर बीओटीची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)उत्पन्नाचा स्त्रोत : वादात अडकलेलाउत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्याचा विचार पुढे आला की बीओटीचा विषय हमखास चर्चेला येतो. यापूर्वी सांगली, मिरजेतील अनेक जागा, इमारती बीओटी तत्त्वावर विकसित करण्यात आल्या. उत्पन्नवाढीच्या चर्चेपेक्षा यातील बेकायदेशीर गोष्टी आणि खाबुगिरीच्या कहाण्याच अधिक चर्चेत आल्या. त्यामुळे उत्पन्नाचा हा स्त्रोत वादात अडकलेला आहे. आॅडिटमध्ये फसलेले प्रकल्प....महापालिका क्षेत्रात झालेल्या बीओटी प्रकल्पांवर विशेष लेखापरीक्षणातही ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे भविष्यातील प्रकल्प कोणत्या पद्धतीने करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘अग्निशमन’च्या जागेवर बीओटीचा घाट
By admin | Updated: November 27, 2015 00:06 IST