जितेंद्र पाटील, लिंबाजी पाटील, संजय पाटील, आनंदराव मलगुंडे, युवराज पाटील, शिवाजी पवार.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : २६ जून रोजी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. तिन्ही गटांतून उमेदवारी मिळण्यासाठी वाळवा तालुक्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषत: बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. तालुक्यात उमेदवारी मिळविण्यासाठी सभासद-कार्यकर्ते कोलांट्या उड्याही मारण्याच्या तयारीत आहेत. मुळे मोर्चेबांधणीला आता गती आली आहे.
कृष्णेवर सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. यामध्ये बहुतांशी संचालक जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. यामध्ये प्रामुख्याने लिंबाजी पाटील (तांबवे), संजय पाटील (इस्लामपूर), सुजित मोरे (रेठरेहरणाक्ष), अमोल गुरव (बहे), जयश्री पाटील (बहे) हे विद्यमान संचालक आहेत. तर येडेमच्छिंद्र गटात पांडुरंग व्होनमाने (चिंचणी), बिज्रराज मोहिते (वांगी) हे सहकार पॅनलचे विद्यमान संचालक आहेत, तर पांडुरंग मोहिते (वांगी), सुभाष पाटील (नेर्ले) संस्थापक पॅनलचे विद्यमान संचालक आहेत. गिरीश पाटील (नेर्ले) हे सहकार पॅनलमध्ये असले तरी महाडिक गटाचे नेतृत्व मानतात. एखादा-दुसरा बदल वगळता या विद्यमान संचालकांनाच आगामी निवडणुकीत त्या-त्या गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
नेर्ले गटात उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच आहे. सहकार गटाचे गिरीश पाटील (महाडिक गट) हे उमेदवार असू शकतील, तर मंत्री जयंत पाटील यांचे स्नेही असलेले संभाजी पाटील यांचीही सहकारातून चर्चा आहे. परंतु महाडिक बंधू जे नाव सुचवतील त्यांचाच विचार सहकार पॅनलमध्ये केला जाईल. नेर्ले आणि रात्रीत फिरले या राजकीय समीकणातून या गटात कोलांट्या उड्या मारणाऱ्या सभासद-कार्यकर्त्यांची रेलचेल राहणार आहे. याच गटात नव्या उमेदीचे प्रदीप पाटील, माजी सरपंच कापूसखेड यांनीही सहकार पॅनलच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.
बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक सभासद आहेत. कॉंग्रेसचे जि. प. सदस्य सहकार पॅनलचे विद्यमान संचालक जितेंद्र पाटील यांचे नेहमीच आव्हान असते. यांच्या विरोधात रयत आणि संस्थापक पॅनलकडून तगडा उमेदवार शोधण्याचे सुरू आहे, तर इस्लामपुरात सहकार पॅनलचे संजय पाटील यांच्याविरोधात रयतकडून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे तर संस्थापककडून युवराज पाटील (नाना), शिवाजी पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत.
चौकट
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रयत्नातून रयत पॅनल आणि संस्थापक पॅनल एकत्र करण्याची चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत आली आहे. एक-दोन दिवसांत ही चर्चा यशस्वी झाली नाही तर होणारी निवडणूक तिरंगी होणार, हे निश्चित.