खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे विहिरीत दत्तात्रय प्रल्हाद पुजारी (वय ३८) या तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. पोलिसांनी मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला. पंचनामा करून शवविच्छेदनानंतर दुपारी अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय पुजारी मंगळवारी सकाळी जनावरे चारण्यासाठी चिंचाळे हद्दीतील रानात गेला होता. अकराच्या दरम्यान जनावरे तिथेच बांधून जेवण्यासाठी घरी आला. जेवण करून दुपारी घरातून बाहेर गेल्यानंतर परत आलाच नाही. गुरुवारी सकाळी पडक्या विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. त्याला पोहता येत नव्हते. तो विहिरीकडे का गेला, हा घातपात की अपघात, याची माहिती पोलीस घेत आहेत. आटपाडीचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, नारायण गरळे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.