बुधगाव : येथील फरशी ओढ्याजवळ अंदाजे ३५ ते ४० वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत नागरिकांनी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवनगर ते बुधगाव जाणाऱ्या रस्त्यावर पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोजवळ मुख्य रस्त्यापासून २५ फूट आतमध्ये बुधगाव गावच्या हद्दीत फरशी ओढा आहे. या ओढ्यात अंदाजे ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह सापडला. स्थानिकांना ही माहिती समजल्यानंतर, त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ओढापात्रात पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी रेस्क्यू पथकाला पाचारण केले. रात्री उशिरा ओढापात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. घटनास्थळी दुर्गंधी सुटली होती. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.