लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी मंगळवारी मिरज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बांधकाम विभागाच्या कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ठिय्या आंदोलन ४ तास सुरू होते. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. कार्यकारी अभियंता संतोष रोकडे त्याठिकाणी आल्यानंतर आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम का रखडले आहे, याबाबत आंदोलनकर्त्यांनी जाब विचारला. यावेळी रोकडे यांना निवेदन देण्यात आले.
आयर्विन पुलास मंजूर असलेल्या समांतर पुलाचे काम येत्या ४ दिवसात सुरू झाले नाही, तर २० मार्च रोजी सांगली बायपास रस्त्यावर शिवशंभो चौकात रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी दिला. यावेळी दीपक माने, अशरफ वांकर, विश्वजित पाटील, कृष्णा राठोड, चेतन मांडूगळकर, अमोल पाटील, दयानंद खोत, अजिंक्य हंबर, नीलेश निकम, शांतीनाथ कर्वे, उमेश हारगे, महेश सागरे, प्रथमेश वैद्य, अमित देसाई, अनिकेत खिलारे अक्षय पाटील आदी उपस्थित होते.