महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील चैत्रबन नाल्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी प्रयत्न करून दहा कोटीचा निधी मंजूर केला होता. त्याला अंतिम मान्यता देण्यासाठी हा विषय स्थायी समितीसमोर आला होता. मात्र भाजपचे सदस्य गजानन मगदूम, सविता मदने यांनी त्याला विरोध केला. एका विशिष्ट नाल्याचे नाव टाकून निधी कसा मंजूर केला तसेच या नाल्यापेक्षा इतर नाल्यांचे बांधकाम करण्याची गरज असल्याचे सांगितले. विरोधी काँग्रेसचे सदस्य प्रकाश मुळके आणि राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी गेल्या पावसाळ्यात चैत्रबन कॉलनीतील नाल्याचे पाणी शिरल्याने या नाल्याची दुरुस्ती व बांधकाम करण्याची गरज आहे. उर्वरित नाल्याच्या कामासाठी ९० कोटींचा निधी आणण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. परंतु भाजप सदस्यांनी एकाच नाल्यासाठी निधीस मान्यता देण्यास विरोध केल्याने सभापती पांडुरंग कोरे यांनी हा विषय प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला.
महापालिका क्षेत्रातील १७५ खोक्यांच्या हस्तांतरणाविषयी बैठकीत चर्चा झाली. यामध्ये विक्री केलेली खोकी, वारस नोंदीची खोकी याची माहिती नसल्याने हा विषय स्थगित करण्यात आला.
चौकट
पे पार्किंगचा विषय चुकीचा
महापालिकेच्या शाळा क्रमांक एक समोरील जागेचा ‘पे अँड पार्किंग’चा विषय चुकीचा असल्याने तो परत पाठविण्यात आला. तेथे समोर मैदान आहे. उलट ‘मदनभाऊ पाटील व्यापारी संकुलासमोरील जागेचा’ असा उल्लेख हवा होता, असे सदस्यांनी निदर्शनास आणून पुन्हा विषय आणण्याचे ठरले. हॉस्पिटलच्या फायर ऑडिटचा अहवाल देण्याची मागणी भाजपच्या सदस्या सविता मदने यांनी केली. काही हॉस्पिटलमध्ये त्रुटी आढळल्याचे मान्य करुन दुरुस्ती करुन घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.