इस्लामपूर : काँग्रेसने देशात ७० वर्षांत काय केले, असे भाजपकडून विचारले जाते. मात्र, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी तुम्ही संवादाऐवजी त्यांच्या वाटेवर खिळे ठोकले, अडथळे उभे केले. पोलिसांकडून लाठीहल्ला केला. काँग्रेसने जनतेला अशी वागणूक कधी दिली नाही, अशा शब्दांत युवा नेते प्रतीक पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढविला.
वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चाचे नेतृत्व प्रतीक पाटील यांनी केले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. आष्टा येथून सुरू झालेल्या या ट्रॅक्टर मोर्चातील कार्यकर्ते तीनशेवर ट्रॅक्टर घेऊन इस्लामपूरच्या तहसील कार्यालयावर धडकले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.
प्रतीक पाटील म्हणाले, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे बदलणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्या होत्या.
संग्रामसिंह पाटील म्हणाले, मोदी-शहांनी देशामध्ये हिटलरशाही सुरू केली आहे. संपूर्ण देश त्याचा सामना करत आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे, सुस्मिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी छाया पाटील, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, संजय पाटील, अमोल गुरव, विश्वजित पाटील, हनुमंत कदम, उद्धव पाटील, सतीश साळी उपस्थित होते.
फोटो - ०९०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर मोर्चा न्यूज : केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे निवेदन इस्लामपूर येथे प्रतीक पाटील, संग्रामसिंह पाटील यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिले. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, विजयराव पाटील, अॅड. चिमण डांगे उपस्थित होते.