भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आहे का, याची तपासणी व फायर ऑडिट करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जिल्ह्यातून व कर्नाटकातून मोठ्या संख्येने रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. येथे उपचारांसाठीही रुग्ण दाखल होतात. भंडारा येथील दुर्घटनेमुळे शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिरज सिव्हिल रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा पुरेशी व सुस्थितीत आहे का ? त्याची देखभाल होते का ? रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्यास तातडीने फायर ऑडिट करावे, रुग्णालयात अत्याधुनिक अशी अग्निशमन यंत्रणा बसवून रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे ,शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, वाय. सी. कुलकर्णी , विजय राठी, ईश्वर जनवाडे, उमेश हारगे, अजिंक्य कत्तिरे यांनी सिव्हिलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. गुरव यांना याबाबत निवेदन दिले. मिरजेतील महापालिकेच्या दवाखान्यांचे व किसान चाैकातील मॅटर्निटी होमचे फायर ऑडिट करण्याची मागणी भाजपतर्फे उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे निवेदनाद्धारे करण्यात आली. उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिका रुग्णालयात याबाबत आवश्यक यंत्रणा कार्यरत राहील, याची काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले.
फाेटाे : ११ मिरज ०४