सांगली : महापालिकेत गेल्या अडीच वर्षांत विषय समित्यांच्या सभापतिपदापासून ते स्थायी सदस्य, गटनेतेपदापर्यंत सारेच पदे भाजप कोअर कमिटीतील सदस्यांच्या घरात अथवा मर्जीतील नगरसेवकांनाच देण्यात आली आहेत. त्यामुळे आता पदापासून वंचित असलेले नगरसेवकही आपल्या आई-वडिलांना कोअर कमिटीत घ्या, अशी मागणी करू लागले आहेत. तसे पत्रही एका नगरसेवकाने भाजप नेत्यांना दिल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पालिकेचा कारभार पाहण्यासाठी भाजपने कोअर कमिटी स्थापन केली आहे. यात शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, दिलीप सूर्यवंशी, सुरेश आवटी यांच्यासह भाजप नेत्यांचा समावेश आहे. गेल्या अडीच वर्षांत कोअर कमिटीशी संबंधित नगरसेवकांनाच स्थायी समितीचे सभापती, प्रभाग सभापती, उपमहापौर, गटनेता अशी महत्त्वाची पदे मिळाली आहेत. त्यामुळे अनुभवी नगरसेवक मात्र नाराज झाले आहेत.
तीन ते चारवेळा निवडून येऊनही त्यांना कसलीच पदे मिळालेली नाहीत. काहींनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा भाजप नेत्यांनी पदाचे आश्वासन दिले होते, पण आजअखेर ते पाळलेले नाही. त्यामुळे केवळ कोअर कमिटीच्या मर्जीतील नगरसेवकांना पदे मिळतात, अशी भावना या नगरसेवकांत वाढीस लागली आहे. त्यातून मिरजेचे नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी आपल्या आईला कोअर कमिटीत घेण्याची मागणी नेत्यांकडे केली आहे. दुर्वे हे सलग १५ वर्षे नगरसेवक आहेत. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांना स्थायी सभापतिपदाचे आश्वासन दिले होते, पण आजअखेर त्यांच्या नावाचा विचार झालेला नाही. दुसरीकडे मिरजेच्या दिगंबर जाधव यांची आई शांता जाधव याही नगरसेविका आहेत. त्यांना इच्छेविरुद्ध प्रभाग समिती चारचे सभापतिपद देण्यात आले होते. त्यामुळे आता दिगंबर जाधव यांनीही वडिलांना कोअर कमिटीत घ्यावे, अशी मागणी केली आहे. कोअर कमिटीत घराची मंडळी असतील तर आपल्यालाही महत्त्वाची पदे मिळतील, अशी भावना त्यांच्यात निर्माण होत आहे.
चौकट
कोअर कमिटी सदस्य मिळालेली पदे
शेखर इनामदार गटनेता, स्थायी सदस्य
सुरेश आवटी उपमहापौर, स्थायी सभापती
मकरंद देशपांडे स्थायी सभापती, विषय समिती सभापती
दिलीप सूर्यवंशी उपमहापौर
नितीन शिंदे स्थायी सदस्य
दिनकर पाटील स्थायी सभापती