लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पैशासाठी फायली अडवल्या जात असल्याचा आरोप करीत भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे आणि नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. खेर दोन तासाच्या आंदोलनानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी फायलीवर स्वाक्षरी केली.
पैशासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात फायली अडवल्याची तक्रार करीत नगरसेवक अजिंक्य पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देत सभागृह नेते विनायक सिंहासने, संजय यमगर, गजानन आलदर, माजी नगरसेवक शिवराज बोळाज हेसुद्धा सहभागी झाले.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याची २५ हजार रुपयांची वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरीसाठी सहा महिने अडकली आहे. याबाबत संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांना भेटत होता. सर्व सह्या होऊनही आरोग्य अधिकाऱ्यांच्या टेबलवर ही फाईल पडून होती. अजिंक्य पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ. आंबोळे यांना फोन करून सही करण्याबाबत विनंती केली होती. वेळ मिळेल तेव्हा सही करतो, असे उत्तर त्यांनी दिल्याने त्यांनी गुरुवारी त्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी डॉ. आंबोळे आणि अजिंक्य पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. अखेर आंबोळे यांनी सही केली. अजिंक्य पाटील म्हणाले की, आरोग्य विभागाचा कारभार कसा चालतो, हे माहीत आहे. किमान कर्मचऱ्यांना तरी त्यांनी या त्रासातून वगळायला हवे. वेळ मिळेल तेव्हा सही करतो, हे उत्तर झाले का? आरोग्य अधिकाऱ्यांनी पैशासाठी फाईल अडविणे संतापजनक आहे.