तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम संपला आहे. या निवडणुकीत भाजपचा गट बॅकफूटवर गेला आहे, तर राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्चस्वाच्या श्रेयवादासाठी दोन्ही गटांकडून अनेक ग्रामपंचायतींवर दावा केला जात आहे.
सुरुवातीलाच तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर विसापूर, सिद्धेवाडी, ढवळीसारख्या ग्रामपंचायतींत संमिश्र फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. यावेळी अनेक गावांत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी एकत्रित येत राजकीय दंगल टाळण्याचा प्रयत्न केला. ज्याठिकाणी असे प्रयोग झाले तेथे अशा संमिश्र पॅनलला घवघवीत यश मिळाले.
ज्या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी काट्याची टक्कर झाली, तेथे मात्र बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचे पारडे जड ठरले. सावळजसारखी महत्त्वाची ग्रामपंचायत भाजपला गमवावी लागली. चंद्रकांत पाटील यांच्या पश्चात जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील यांनी सावळज ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता ताब्यात घेत राजकीय कर्तृत्व सिद्ध केले.
मांजर्डेत यावेळी दिनकरदादा पाटील यांच्या पश्चात अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीची सत्ता कायम ठेवण्यात पंचायत समितीच्या सभापती कमल पाटील आणि मोहन पाटील यांना यश मिळाले. पेडमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात घेतली.
येळावीत भाजपच्या कारभाऱ्यांना सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश मिळाले. याठिकाणी काँग्रेसचे विजयअण्णा पाटील, विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून भाजपच्या ताब्यातून ग्रामपंचायत काढून घेतली. कवठेएकंद येथील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात भाजपला यश मिळाले. शेकापशी हातमिळवणी करून पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केले. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडल्यामुळे ही ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली होती.
बोरगाव येथे पंचायत समितीचे सदस्य संभाजी पाटील यांना सत्ता टिकवण्यात अपयश आले, तर हातनोलीमध्ये बाजार समितीचे सभापती अजित जाधव यांना सत्ता मिळवण्यात अपयश आले. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांनी भाजपची एकहाती सत्ता मिळवली. तुरचीत जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांना स्वत:च्या गावात सत्तास्थान गमावण्याची वेळ आली.
चौकट :
वर्चस्ववादासाठी दोन्ही गटांचा ग्रामपंचायतीवर दावा :
ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागल्यानंतर तालुक्यावर वर्चस्व असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. सोशल मीडियावर अनेक ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता असल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला. काही कारभाऱ्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिशाभूल करून आम्ही तुमचेच असेही सांगितले. त्यामुळे निकाल लागला तरी काही ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे हा प्रश्न कायम राहिला असून सरपंच निवडीनंतरच याचा फैसला होणार आहे.