सांगली : वाढीव वीज बिल माफ करावे, वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा मागे घ्याव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने सांगलीत महावितरण कंपनी कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. आमदार, जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्यावतीने शहर कार्यालयाला टाळे ठोकून निदर्शने करण्यात आली.
महावितरण कंपनीने कोरोनाच्या काळात वाढीव वीज बिले पाठविली आहेत. ही बिले माफ करावीत, यासाठी भाजपने शुक्रवारी सांगली शहरात टाळेठोक आंदोलन केले. विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयावर आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदेम्हैसाळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, सरचिटणीस मकरंद देशपांडे, माजी महापौर संगीता सुतार, धीरज सुर्यवंशी, मुन्ना कुरणे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. तर खण भागातील महावितरणच्या शहर कार्यालयासमोर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली टाळेटोक आंदोलन झाले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे खोटारडे आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिले माफ करण्याचे खोटे आश्वासन दिले. पण आता राज्यातील ७५ लाख ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा देऊन जनतेला अंधारात टाकण्याचे पाप सरकारने केले आहे. कोरोना लाॅकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडल्याने लोकांकडे पैसे नाहीत. अशा काळात सरकारकडून तिप्पट वीज बिल वसुली सुरू आहे. वीज कनेक्शन तोडण्यासाठी दिलेल्या नोटीसा तातडीने मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा महावितरण कंपनीचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी भाजपच्यावतीने देण्यात आला.
यावेळी ज्योती कांबळे, छाया हाक्के, स्मिता पवार, गंगा तिडके, वैशाली पाटील, सोनाली सागरे, मंगल मोरे, माधुरी वसगडेकर, सुनीता इनामदार, सुस्मिता कुलकर्णी, शैलजा पंडित, गौरी माईनकर, लीना सावर्डेकर, संगीता जाधव, हिना शेख, मनीषा शिंदे, संगीता चव्हाण, मंजुळा कुंभार, वैशाली पडळकर, मनीषा चव्हाण उपस्थित होत्या.