ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा देवाचे मंदिर सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व पुजाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजबांधवांचे आराध्य दैवत असलेल्या श्री बिरोबा देवाचे दर्शन कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. त्यातूनही कोणी आदेश डावलून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कर्नाटकातील चिंचलीच्या मायाक्का देवीला येणारे नव्वद टक्के भाविक देवदर्शनासाठी बिरोबाला येतात. हे लोक मुंबई, पुणे अशा शहरी भागातून येतात. त्यामुळे हे पाऊल उचलले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस सरपंच आबासाहेब साबळे, उपसरपंच बिरुदेव कोळेकर, पोलीसपाटील रामचंद्र पाटील, पैलवान रावसाहेब कोळेकर, ग्रामसेवक ए. डी. काळे, गावकामगार तलाठी कल्पना आंबेकर, विलास ठोंबरे उपस्थित होते.
चौकट
केवळ धार्मिक विधी, पूजा
मंदिरामध्ये धार्मिक विधी, पूजा होईल. मात्र दर्शन बंद करण्यात आले आहे. सर्व व्यावसायिकांना नोटीस देण्यात येणार आहे, असे खजिनदार जगन्नाथ कोळेकर यांनी सांगितले. भाविक आत येऊ नयेत म्हणून जेसीबी यंत्राने मंदिराभोवती चर काढण्यात येणार आहे.