पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या तोडणी-वाहतूक करारांचा प्रारंभ अध्यक्ष आमदार अरुण लाड यांच्याहस्ते पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
अरुण लाड म्हणाले की, येत्या हंगामात दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट यशस्वी करायचे आहे. कारखाना ऑनलाईन नोंदी घेत असल्याने क्रांती शेतकरी मित्र ॲप डाऊनलोड करावे. यातून पेपरलेस वर्क आणि कोरोनाच्या काळात दक्षता घेणे सोपे होईल. ऊस विकास सुविधा राबविल्यामुळे एकरी उत्पादन ४७ टन इतके झाले आहे. कार्यक्षेत्रामध्ये ५२ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचन प्रणाली बसविण्यात आली आहे.
शेती अधिकारी दिलीप पार्लेकर म्हणाले की, दहा हजार ५०० हेक्टर ऊस नोंद झाली आहे. यातून १२ लाख टन ऊस उपलब्ध होईल.
यावेळी कृष्णत पाटील (निंबळक), गणपतराव चव्हाण (खटाव), गणपती सावंत (अंकलखोप), जयवंत देशमुख (वांगी), हणमंत लाड (कुंडल) यांचा प्रातिनिधिक स्वरूपात करार करण्यात आला.
यावेळी संचालक सतीश चौगुले, संपतराव सावंत, गुंडाभाऊ चौगुले, जयप्रकाश साळुंखे उपस्थित होते.