शिरटे : सहकारमहर्षी जयवंतराव भाेसले यांचे सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्य नव्या पिढीसह समाजासमोर आणण्याचा हेतू ठेवून महाविद्यालयात जयवंतराव भाेसले अध्यासन केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे यांनी दिली.
रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कृष्णा महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. रमेशकुमार गवळी, सल्लागार समितीच्या समन्वयक डॉ. स्नेहल राजहंस, खजिनदार प्रा. संजय मुळीक, ए. एस. लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. साळुंखे म्हणाले, येथील शैक्षणिक परिसर उभा करण्यात जयवंतराव भाेसले यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जयवंतराव भाेसले अध्यासन केंद्र सुरू होत आहे. यातून येत्या पाच वर्षांत जयवंतराव भाेसले यांचे मूर्त स्वरूपातील काम समाजाला पाहायला मिळेल. त्यांच्या प्रत्येक कामाची नोंदणी, त्यातून झालेला उत्कर्ष, साहित्य, चित्रफिती, मुलाखती, आदींचे संकलन व प्रकाशन करणार आहे.
भाेसले यांच्याविषयी अभ्यासाला विध्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे व दुर्मीळ छायाचित्रांचे संकलन करणे या उद्दिष्टांसह आठवणींचा जागर, व्याख्याने, दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाबरोबर शेती, सहकार, जलसिंचन, शिक्षण, वैद्यकीय सेवा या विषयीचे संशोधन या उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे. महाविद्यालयात जयवंतराव भाेसले बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे तीनशे दुर्मीळ वनस्पतींचे जतन केले आहे. राज्यात हा एकमेव प्रयोग आहे. येत्या एक ते पाच फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय पातळीवरील शेतीविषयक कार्यशाळा होणार असल्याचे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.
फोटो - २५०१२०२१-आयएसएलएम-जयवंतराव भाेसले (सिंगल फोटो)