तासगाव : आज स्त्री गर्भात सुरक्षित नाही. मात्र ललिता, सिंंधू, साक्षीने आॅलिम्पिकमध्ये उज्ज्वल कामगिरी करून देशाची लाज वाचवायचे काम केले आहे, अशा शब्दात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ललिता बाबरचे कौतुक केले. तसेच तरुणांनी ध्येयाची स्वप्ने पाहून ध्येयासाठी सैराट व्हायला हवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तासगाव येथील स्वराज्य फौंडेशनच्यावतीने गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंंदे, तासगावचे उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंंगळे, स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष किरण माने यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. नांगरे-पाटील म्हणाले, तुम्ही केवळ सैराट आहात का? हे पाहायला हवे. बीड जिल्ह्यात स्मशानभूमीत जळणाऱ्या चितेच्या उजेडात अभ्यास करणाऱ्या एका मुलीला दहावीत ९८ टक्के मार्क मिळाले. या मुलीनेही हैदराबादला जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र ते आर्ची आणि परशा होऊन नव्हे, तर आयपीएसचे प्रशिक्षण घ्यायला. स्वप्ने अशी असायला हवीत.ते म्हणाले की, ज्या वयात तरुणाई डॉल्बीच्या तालावर झिंंगाट होऊन नाचतेय, त्या वयात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. तरुण वयात पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरतात. तसेच याच वयात चुकीच्या मार्गाने गेल्यास आयुष्याची वाट लागते. आपल्यातील संधी आणि धोके ओळखता आले पाहिजेत. आपले उद्दिष्ट काय आहे, हे माहीत करून घेतले पाहिजे. ध्येयाबद्दल माहितीच नसेल, तर पराभव चाखावा लागेल. मी स्वत: दोन वर्षे अभ्यासासाठी संघर्ष केला, त्यामुळेच आज या ठिकाणी पोहोचलो आहे. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंंदे म्हणाले, आजची तरुणाई करिअर सोडून अन्य गोष्टींसाठी सैराट होत आहे. मात्र तरुणांनी करिअरसाठी सैराट होऊन अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले, तर आपल्यातील अनेकजण आयएएस, आयपीएस होतील. त्यासाठी सैराट होऊन अभ्यास करण्याचे आवाहन शिंंदे यांनी यावेळी केले. खासदार संजयकाका पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वराज्य फौंडेशन, नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी ललिता बाबर यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
ध्येयाच्या पूर्तीसाठी सैराट व्हा!
By admin | Updated: September 9, 2016 01:14 IST