सांगली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान गतीने राबविण्याबरोबरच यामधील सिमेंट बंधारे अधिक दर्जेदार आणि गुणात्मक होण्यासाठी खबरदारी घ्या, अशा सूचना पुणे विभागाचे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केले. जलयुक्त शिवाराचा आढावा घेण्यासाठी आज (शुक्रवार) एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. यामध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, रोजगार हमीच्या उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे, जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे आदी उपस्थित होते.चोक्कलिंगम म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील १४१ गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी सर्व यंत्रणांकडून सर्वसमावेक्षक असा ३५८ कोटी ११ लाख रुपयांचा कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये जलयुक्त अभियानांतर्गत ११८ कामे सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये पाणलोट विकास, गाळ काढणे, सिमेंट नालाबांध, सूक्ष्म सिंचन, पाझर तलाव दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण, तसेच विहीर पुनर्भरण यासारख्या कामांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधाऱ्याचे काम अतिशय दर्जेदार आणि गुणात्मक करण्याची खबरदारी घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या. जलयुक्त शिवारासाठी लोकसहभागातून श्रमदानाची विशेष मोहीम हाती घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यामध्ये हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
बंधारे गुणात्मक करण्याची खबरदारी घ्या
By admin | Updated: March 14, 2015 00:19 IST