आटपाडी : प्राथमिक शिक्षक बँकेच्या माध्यमातून शिक्षकांचे आर्थिक व सामाजिक मूल्य वाढविण्यात शिक्षक बँकेचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी केले.
शिक्षक बँकेला म्हैसूर येथे मिळालेल्या मानाच्या ‘बँको’ पुरस्काराच्या सन्मानार्थ अध्यक्ष यु. टी. जाधव व उपाध्यक्ष राजाराम सावंत यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्राजक्ता कोरे बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी शिक्षक बँकेच्या विविध योजनांचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी शिक्षक बँकेचा सभासद मयत झाल्यानंतर मृतसंजीवनी योजनेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतकार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
उपाध्यक्ष राजाराम सावंत यांनी स्वागत केले. यु. टी. जाधव यांनी शिक्षक बँकेच्या माध्यमातून सभासद हिताच्या राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यासाठी शिक्षक समितीच्या पुरोगामी सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, राज्य संघटक सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील, सचिव शशिकांत भागवत, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे व सर्व संचालकांच्या सहकार्याने बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
यावेळी शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. कोले, व्यवस्थापक महांतेश इटंगी, उपव्यवस्थापक प्रमोद पाटील, विजय नवले, विभुतवाडीचे सरपंच चंदकांत पावणे, संजय थोरात, कैलास वाघमारे आदी उपस्थित होते.