फोटो ओळ -- कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे वादळी वारे आणि पावसाने केळीची बाग भुईसपाट झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागात शनिवारी सायंकाळपासून वादळी वारे वाहत आहे. रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून पावसासह वाऱ्याचा वेग वाढला होता. त्याचा मोठा परिणाम शेतीवर झाला आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा पडल्याने वीज पुरवठा बंद झाला होता, तर रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. काही ठिकाणी केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, समडोळी, कावठेपिरान, दुधगाव परिसरात शनिवारपासून वातावरण बदलले आहे. रविवारी मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहत होते. त्याचबरोबर पावसाचा जोर दिसत आहे. या वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. केळीच्या बागा पडल्या आहेत. आगामी गळितास जाणाऱ्या ऊस पिकांची मोठी हानी झाली आहे. शेकडो एकर ऊस पडला आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे विविध ठिकाणी शेडचे पत्रे निघाले आहेत. कसबे डिग्रज शाळेजवळ खोल्यांवरील पत्रे उडत होती. विजेच्या ताराही लोंबलकत आहेत. त्याचबरोबर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.
चौकट
मदतीची मागणी
वादळी वारे आणि अवकाळी पावसाने मिरज पश्चिम भागात ऊस, केळी, ढोबळी मिरची, भाजीपाला भुईसपाट होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची दुकाने व गोठा शेडचे पत्रे निकामी झाली आहेत. याचे शासनाने पंचनामे करून अडचणीत आलेल्या लोकांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव नलवडे यांनी केली.