सांगली : जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर दोन्ही बाजूंना २१ मार्चला बांबू लागवडीस सुरुवात होत आहे. सांगली, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. दि. १४ रोजी पलूस तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण होणार आहे, अशी माहिती लोकचळवळीचे डॉ. मनोज पाटील, मानसिंग बँकेचे अध्यक्ष जे. के. बापू जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, बांबू लागवडीबाबत २६ जानेवारी २०१९ पासून प्रयत्न सुरू आहेत. या लागवडीमुळे मातीची धूप थांबेल. कार्बनच्या शोषणासह नव्या उत्पन्नाचे साधन मिळणार आहे. पाणी असले-नसले तरी बांबू जगतात, वेगाने वाढतात तसेच चौथ्या वर्षापासून शेतकऱ्यांना उत्पादन सुरू होते. कृष्णाकाठावरील शेतकऱ्यांना लागवडीसाठी केवळ अर्ज भरून द्यावयाचे आहेत. त्यांना रोपे मोफत मिळणार असून, रोपांची जपणूक त्यांनीच करावयाची आहे. पहिल्या टप्प्यात १४ गावांतून ५३९५ रोपांची लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे पुरातही बांबूची टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांसह कृषी महाविद्यालये, वालचंद महाविद्यालयाची मदत घेतली आहे. तुपारी, दुधोंडी ते भिलवडीपर्यंत वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरात बांबू लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हरिपूर, मौजे डिग्रज येथील लागवडीस जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित राहतील, असेही जे. के. बापू जाधव यांनी सांगितले.
यावेळी प्रसन्न कुलकर्णी उपस्थित होते.