कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अभिव्यक्ती प्रतिष्ठान देशिंग-हरोली मार्फत दि. २५ ऑगस्टला चौथे अभिव्यक्ती बालकुमार साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका व कवयित्री डॉ. संगीता बर्वे, संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी सुभाष कवडे, कवि संमेलनाध्यक्ष म्हणून देशिंग हायस्कूलची विद्यार्थिनी व बालकवयित्री अस्मिता चव्हाण आहेत, अशी माहिती अभिव्यक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष कवयित्री मनीषा पाटील यांनी दिली.
संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे. कोरोनामुळे हे संमेलन ऑनलाईन घेण्यात येणार आहे. संमेलनाचे प्रसारण अभिव्यक्ती प्रतिष्ठानच्या फेसबुक समूहावर सकाळी दहा वाजता होणार आहे. संमेलनामध्ये शालेय मुलांना जास्तीतजास्त संधी मिळावी यासाठी संमेलनाच्या सर्व सत्रांमध्ये फक्त विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. सांगली जिल्ह्यातील बालसाहित्यिक या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. संमेलनाचा जास्तीतजास्त लाभ सर्व साहित्य रसिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. सर्जेराव पाटील, कार्यवाह राहुल निकम, उपाध्यक्ष सीमा निकम, सचिव ॲड. पृथ्वीराज पाटील व आबासाहेब पाटील उपस्थित होते.