सांगली : महापालिका क्षेत्रात २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधित ‘आझादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमाचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.
केंद्र आणि राज्य शासनाकडून या कालावधीत देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातसुद्धा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सभागृहात स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि घंटागाडीचालक यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, पर्यावरण अभियंता ऋषिकेश किल्लेदार, वैष्णवी कुंभार, शहर समन्वयक अधिकारी वर्षा चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. ताटे यांनी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. २ ऑक्टोबर रोजी भव्य रॅलीने या महोत्सवाची सांगता होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.