लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : इंडियन मेडिकल असोसिएशन तथा आयएमएच्या ११ डिसेंबररोजीच्या प्रस्तावित संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत. तसा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला. आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली आहे.
समितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना आगामी काळात एकत्र काम करतील, अशी घोषणा समितीच्या बैठकीत करण्यात आली. आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (दि. ११ ) राज्यातील दीड लाखांहून अधिक आयुष डॉक्टर्स गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा देतील. केंद्र शासन व भारतीय चिकित्सा परिषदेच्या अभिनंदनाची पत्रे सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देतील.
समितीचे अध्यक्ष तथा निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी सांगितले की, सरकारच्या निर्णयामुळे रुग्णसेवेतील कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. शल्य व शालाक्यतंत्र विषयांतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांकडून अधिकाधिक रुग्णांना सेवा मिळेल. यामुळे शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे. आयुर्वेदाला राजाश्रय मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.
टेंभुर्णीकर म्हणाले की, या निर्णयाविरोधात आयएमए निष्कारण संभ्रम निर्माण करत आहे. शासनाच्या निर्णयाने ग्रामीण भागात चांगले शल्यचिकित्सक उपलब्ध होणार आहेत. काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदिक डॉक्टर्स शस्त्रक्रिया करतील. आयुर्वेदाच्या पदवीधरांना मिश्र चिकित्सेला परवानगीविरोधात आयएमएने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण अंतरिम स्थगितीस न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. सर्वोच्च न्यायालयातही याचिका फेटाळली आहे. या स्थितीत आयएमएने संभ्रम निर्माण करु नयेत.
चौकट
मिक्सोपॅथी, खिचडीफिकेशन नव्हे
आयुष कृती समितीने सांगितले की, आयुर्वेदिक डॉक्टरांचे प्रशिक्षण, गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा आयएमएचा प्रयत्न दुर्दैवी आहे. राजपत्राविषयी ‘मिक्सोपॅथी’, ‘खिचडीफिकेशन’ असा उल्लेख म्हणजे एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल. प्रत्येकवेळी संप, काम बंद आंदोलन, निदर्शने याद्वारे जनतेला वेठीस धरण्याचा आयएमएचा प्रयत्न समाजहितासाठी अनुचित आहे.
--------------------