लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या रुग्णाजवळ जाण्यास एकीकडे नातेवाईक टाळाटाळ करीत असताना महापालिकेचे कर्मचारी व खासगी ठेकेदारांकडील कामगार मात्र गेल्या वर्षभरापासून मृत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करीत माणुसकी जिवंत ठेवली आहे. आतापर्यंत केवळ एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. दुर्दैवाने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पण त्यानंतर मात्र बचावाची सारी साधने उपलब्ध करून दिल्याने एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली नाही.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाने जिल्ह्यात प्रवेश केला. पहिलाच रुग्ण दगावल्याने संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली. या रुग्णांवर अंत्यसंस्कारावेळी तर महापालिकेचे कर्मचारी चांगलेच धास्तावले होते. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दररोज २० ते २२ मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर आली. याच काळात स्वच्छता निरीक्षकाला कोरोना झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यसंस्काराचे काम खासगी ठेकेदाराकडे देण्यात आले. सांगलीतील टायगर ग्रुपने हे काम हाती घेतले. कर्तव्य व सेवाभाव जपत या कामगारांकडून अंत्यसंस्काराचे काम पार पाडत आहेत. नियमांचे पालन केल्याने ते आजअखेर तरी कोरोनपासून दूरच आहेत. ज्याठिकाणी कोणी जवळ येत नाही, तेथे स्वत: पुढाकार घेऊन ते विधिवत अंत्यसंस्कार करून माणसुकीचा धर्मही पाळत आहेत.
चौकट
कोट
मृत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी आम्ही घेतली. थोडी मनात भीती होती. पण प्रशासनाने सहकार्य केेले. पीपीई कीट, सॅनिटायझेशनची व्यवस्था केली. त्यामुळे धीर आला. घरात जाताना बाहेरच स्नान करून वस्तू सॅनिटायइज केल्यानंतर प्रवेश करतो. - अकुंश ऊर्फ पिंटू माने
चौकट
कोट
कोरोनाबाधित रुग्णावर अंत्यसंस्कार करताना सुरुवातीला मनात प्रचंड भीती होती. मात्र हे काम कुणीतरी केले पाहिजे, ही भावनाही होती. त्यामुळे अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. घरात जाताना आवश्यक ती खबरदारी घेऊनच जातो. कुटुंबाचीही साथ मिळाल्याने हे काम करता आले. - राजू जाधव
चौकट
कोट
कोरोनाच्या सुरुवातीला कोणाचा मृत्यू झाल्याचे ऐकले तरी भीती वाटायची. अंत्यसंस्काराची जबाबदारी अचानकच आली. सरण रचण्यापासून ते शेवटपर्यंत आम्ही थांबतो. प्रशासनाकडून पीपीई कीट व इतर सुविधा दिल्या जातात. त्यामुळे कोरोनामुळे आमचा बचाव होतो. - भरत पवार
चौकट
शहरातील स्मशानभूमी : १
मृतदेहावर अंंत्यसंस्कार करणाऱ्यांची संख्या : ६
आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह : ४८,७९९