संजयनगर : काेराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नाक आणि तोंडावर मास्क अथवा रुमाल वापरणे बंधनकारक केले. मात्र कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेऊ लागल्याने गेल्या काही दिवसांपासून सांगलीकर मास्क वापरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांना मास्क वापरण्यासाठी शिस्त लागावी. यासाठी काही दिवसांपूर्वीपर्यंत महानगरपालिकेकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. पोलीस यंत्रणेकडूनही विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला जात हाेता. मात्र जसजसा काेराेनाचा प्रभाव कमी हाेऊ लागला, तसतसे मास्क वापराबाबतचे गांभीर्य कमी हाेऊ लागले आहे. अनेक सांगलीकर घराबाहेर पडताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. अनेक जणांच्या चेहऱ्यावर मास्क हा अक्षरशः नाक आणि तोंडाच्या खाली सरकलेला असतो तर काही जण केवळ पोलिसांना व महापालिकेच्या कारवाईच्या भीतीपोटी मास्क वापरतात.
मारुती रोड, मेन रोड चौक, कॉलेज कॉर्नर, मटन मार्केट, शिवाजी मंडई, भाजी मार्केट या गर्दीच्या ठिकाणी निम्म्याहून अधिक सांगलीकर मास्क वापरण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. सकाळी उद्यानामध्ये व्यायाम करण्यासाठी येणारे नागरिकही मास्क वापरण्यास टाळाटाळ करतात. अनेक ठिकाणी विक्रेते व दुकानदारही मास्क वापरत नसल्याचे पहायला मिळत आहे.