सांगली : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बाधितांवर उपचारासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. यासाठी आवश्यक असलेली साधने मिळविण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानुसार गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात ४२ व्हेंटिलेटर्स व २० बायपॅप मशीनची उपलब्ध करण्यात आली असून शासकीय रुग्णालयांसह विविध खासगी रुग्णालयांना यांचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसात रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध झालेल्या ४२ पैकी ३२ व्हेंटिलेटर प्रशासनामार्फत खरेदी करण्यात आले आहेत. तर दहा व्हेंटिलेटर्स वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजसाठी राज्य शासनाकडून उपलब्ध झाले आहेत.
यामध्ये शासकीय रुग्णालय मिरज, भारती हॉस्पिटल येथे प्रत्येकी तीन, मिरज ग्रुप ऑफ फिजिशियन मिरज यांना २, सिनर्जी हॉस्पिटल , सायना कोविड सेंटर गणेश नगर सांगली यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जत कोविड हॉस्पिटल चार, भगवान महावीर कोविड हॉस्पिटल सांगली आणि क्रीडा संकुल प्रत्येकी तीन, विवेकानंद हॉस्पिटल बामनोली दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय श्वास हॉस्पिटल सांगली, घाडगे हॉस्पिटल सांगली, लाईफ केअर तासगाव, श्री हॉस्पिटल विटा, सद्गुरू हॉस्पिटल विटा, कवठेमहांकाळ कोविड हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटल पलूस, देशमुख (सत्रे) चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल इस्लामपूर , प्रकाश मेमोरियल क्लिनिक इस्लामपूर यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आटपाडी ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.