लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील कापूसखेड नाका परिसरात असलेल्या सलून दुकानामध्ये बसण्यासाठी खुर्ची दिली नाही, म्हणून एकावर कोयत्याने हल्ला चढवत, त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी सकाळी ११च्या सुमारास घडला. पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली आहे.
या हल्ल्यातील जखमी नीलेश संपत काळुगडे (वय २७, रा.माळगल्ली, इस्लामपूर) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रफिक इकबाल सैदेखान याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोेंद करण्यात आला आहे.
नीलेश काळुगडे हा सकाळी केस कापण्यासाठी सलूनमधील खुर्चीमध्ये बसला होता. त्यावेळी सैदेखान याने तेथे येऊन मला बसायला खुर्ची दे, असे म्हणाला. काळुगडे याने माझा नंबर आहे, असे म्हटल्यावर सैदेखान याने दमदाटी करत निघून गेला. थोड्या वेळाने तो कोयता घेऊन सलूनमध्ये आला. तेथे सैदेखान याने, तुला खल्लास करून टाकतो, असे म्हणत कोयत्याने त्याच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. काळुगडे याने कोयत्याचा वार हातावर झेलल्याने त्याच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडविण्यास येणाऱ्या इतरांना सैदेखान याने कोयत्याचा धाक दाखवित धमकाविले. याच वेळी काळुगडे याने तेथून पळ काढल्याने तो बचावला.