इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे उपचारासाठी उसनवार दिलेले पैसे परत मागितले म्हणून तिघा भावांनी बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला केला. हा प्रकार ६ मेच्या सायंकाळी घडला.
याबाबत जखमी निवास दिनकर पवार (३५, गोपाळ वस्ती, कि.म.गड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मेहुणे अमोल बाबू चव्हाण, मनोज बाबू चव्हाण आणि स्वप्निल ऊर्फ नाना बाबू चव्हाण (रा. भवानीनगर) या तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जखमी निवास यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर आई शारदा आणि भाऊ अनिल व दीपक यांच्यावर इस्लामपूर येथे उपचार झाले.
निवास पवार यांनी मेहुणा अमोल याला आपल्या पत्नीसमक्ष औषधोपचारासाठी फेब्रुवारीत २२ हजार रुपये उसनवार दिले होते. या पैशांची मागणी केल्यावर अमोल टाळाटाळ करत होता. ६ मेच्या सायंकाळी पैसे मागितल्यावर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर साडेसातच्या सुमारास अमोल व त्याच्या दोन भावांनी कि.म.गडमधील निवास यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत धमकी दिली. यावेळी पुन्हा वाद झाल्यावर अमोलने कोयत्याने निवास यांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूस वार करून गंभीर जखमी केले. भांडण सोडविण्यास आलेल्या आई व दोन भावांना स्वप्निल आणि मनोज यांनी लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. हवालदार उत्तम माळी अधिक तपास करत आहेत.