जानेवारी २०२१ मध्ये डोर्ली (ता. तासगाव) अंगणवाडी सेविका भरतीसाठी जाहिरात निघाली होती. या जाहिरातीनुसार मोनिका सदाकळे व अरुणा पाटील यांनी अर्ज केले होते. यामध्ये मोनिका सदाकळे यांची निवड झाली होती. परंतु, यावर दोन नंबरला नाव असलेल्या अरुणा पाटील यांनी आक्षेप घेतला होता. भरती झालेल्या महिलेने वय कमी असताना जादा दाखविल्याचा तक्रार केली होती. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सुनावणी सुरू होती. यात भरती झालेली महिला दोषी आढळली. त्यामुळे डुडी यांनी या महिलेस बडतर्फ करून अरुणा पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे अपात्र महिलेने गोंधळ करीत या भरती प्रक्रियेला जिल्हा परिषद प्रशासनही दोषी असल्याचा आरोप केला. यावर डुडी यांनी प्रशासनातील दोषींवरही कारवाई करणार असल्याचे सांगितले.
मात्र या महिलेचे समाधान झाले नाही. तिच्याबरोबर आलेल्या एका संघटनेचे पदाधिकारी सुधाकर गायकवाड यांनी यात हस्तक्षेप सुरू केला. या पदाधिकाऱ्यांनी सीईओंच्या केबिनचा दरवाजा जोरदारपणे ढकलून आत प्रवेश केला. डुडी यांना धमकी देऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा करीत गोंधळ घातला. यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तेथे धावत आले. त्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंंतु, त्यांनी सीईओंना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. डुडी यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी ऐकले नाही. डुडी यांनी तातडीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांना बोलावून घेतले. संबंधितांना त्वरित पोलिसांच्या हवाली करण्यास सांगितले. विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये सुधाकर गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मात्र संबंधित व्यक्तीने डुडी यांची माफी मागितली.