ढालगाव : इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे मेंढ्यांच्या (वाघरीवर) खांडावर लांडग्यांच्या कळपाने रविवारी मध्यरात्री हल्ला करून अठ्ठेचाळीस मेंढरांचा फडशा पाडला. या हल्ल्यात दहा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामुळे मेंढपाळाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी एस. डी. कांबळे यांनी दिली.इरळीपासून २ किलोमीटर अंतरावर प्रमोद संभाजी जाधव यांच्या शेतात पिंटू धुळाप्पा बंडगर, कृष्णा सुऱ्याबा लांडगे, सुनील कऱ्याप्पा मोरडे, खाणवती आत्माराम लांडगे (सर्व रा. काणेगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील मेंढरे शेतात खतासाठी बसविली होती.रविवारी रात्री पाऊस आल्याने सर्व मेंढपाळ प्रमोद जाधव यांच्या घरी झोपले होते. दरम्यान, या संधीचा फायदा उठवत मध्यरात्री बाराच्या सुमारास कळपावर हल्ला केला. लांडग्यांनी ४८ मेंढ्यांचा फडशा पाडला. यामध्ये २३ मेंढ्या, लहान २५ कोकरे, तर जखमी १० ते १२ मेंढ्यांचा समावेश आहे. सततचा पाऊस आणि थकवा यामुळे मेंढपाळांना तीन तासानंतर ही घटना समजली. मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तलाठी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. सुमारे हजार मेंढ्यांचा खांडवा शेतात होता. पावसाळ््याच्या दिवसात दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ मेंढ्या घेऊन कवठेमहांकाळ तालुक्यात येत असतात. हे मेंढपाळ आता परतीचा प्रवास करीत आहेत. (वार्ताहर)
लांडग्यांच्या हल्ल्यात अठ्ठेचाळीस मेंढ्या ठार
By admin | Updated: September 1, 2014 23:08 IST