सांगली : कर्जापोटी पिग्मी देण्यास टाळाटाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या पिग्मी एजंटवर कर्जदाराने हल्ला करून जखमी केल्याची घटना येथील रिसाला रस्त्यावरील हिराबाग कॉर्नरवर आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता घडली. उत्तम रामचंद्र पाटील (वय ४३, रा. सावंत प्लॉट, गल्ली क्रमांक तीन, शंभरफुटी रस्ता, सांगली) असे पिग्मी एजंटचे नाव आहे. याप्रकरणी कर्जदार नासीर सरदार मुजावर (रा. पाथरवट गल्ली, खणभाग, सांगली) याच्यासह त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी पाटील यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा उजवा पाय मोडला आहे. डोक्यालाही दुखापत झाली आहे. ते रिक्षाचालक असून, ज्ञानदीप सहकारी सोसायटीमध्ये पिग्मी एजंट म्हणूनही काम करतात. संशयित मुजावरची हिराबाग कॉर्नरवर पानटपरी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने संस्थेमधून व्यवसायासाठी ७० हजारांचे कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड म्हणून प्रतिमहिना दोन हजार शंभर रुपये हप्ता ठरविण्यात आला आहे. यासाठी त्याला दररोज ७० रुपये पिग्मी भरावी लागते. गेल्या सव्वादोन वर्षांत त्याने साठ हजारांची परतफेड केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो दररोज पिग्मी भरत नाही. पाटील पिग्मी आणण्यासाठी गेल्यानंतर तो पानटपरीत हजरच नसे. महिन्यातून केवळ दहा ते बारा वेळा तो पिग्मी देत होता.आज पाटील नेहमीप्रमाणे पिग्मी आणण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे पाटील यांनी त्याला, ‘तुम्ही दररोज पैसे भरत नसल्याने कर्ज कधी फिटणार? संस्थेचे पदाधिकारी याचा मला जाब विचारतात. तुम्ही दररोज पिग्मी दिली पाहिजे’, असे सांगितले. यावरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. हा वाद वाढत गेल्याने परिसरातील लोक जमा झाले. यामुळे मुजावरला राग आला. त्याने पाटील यांना मारहाण केली. पानटपरीत त्याचे दोन साथीदार होते. त्यांनीही पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. (प्रतिनिधी)
कर्जदाराचा पिग्मी एजंटवर हल्ला
By admin | Updated: June 28, 2014 00:43 IST