कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्व एटीएम सेवा पाच दिवसांपासून बंद आहे. बँकांच्या दारात रांगा लागत आहेत.
पश्चिम भागात जिल्हा बँकेच्या शाखेतील एटीएमच्या सेवावगळता कोकरूड, शेडगेवाडी फाटा, चरण, आरळा या चार गावांत बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, अक्सिक्स बँक यांचे एटीएम आहेत. मात्र, पाच दिवसांपासून काही मशीनमध्ये पैसे नाहीत तर काही मशीनला पैसे असूनही इंटरनेट सेवा खंडित असल्याने पैसे निघत नाहीत. जिल्हा बँकेच्या एटीएममध्येही पैसे उपलब्ध नसल्याने लोकांना पर्यायाने बँकेचे दरवाजे ठोठावे लागत आहेत.
कोकरुड येथील बँक ऑफ इंडिया आणि सहकारी बँका, शेडगेवाडी येथील जिल्हा बँक, चरण येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि आरळा येथील जिल्हा बँक व युनियन बँक यांच्यासमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रांगेत उभे असलेल्या ग्राहकांकडे सॅनिटायझर नाहीत. वेगवेगळ्या गावचे असल्याने ते कोरोनाबाधित आहेत की नाहीत, हेही समजत नाही. एटीएम सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.