सांगली/आटपाडी : जिल्हा परिषदेच्या गोमेवाडी (ता. आटपाडी)तील कदमवाडी येथील प्राथमिक शाळेतील खोल्या बांधकामाचा मंजूर झालेला निधी देण्यासाठी मुख्याध्यापकाकडून तीन हजारांची लाच घेणाऱ्या आटपाडी पंचायत समितीमधील सर्वशिक्षा अभियान विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले. घन:श्याम नागनाथ थोरात (वय ३९, रा. वशी, ता. वाळवा, सध्या रा. वारणाली, विद्यानगर गल्ली क्रमांक ४, विश्रामबाग, सांगली) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली.गोमेवाडीतील कदमवाडीत शाळेच्या दोन खोल्यांचे बांधकाम केंद्र शासनाच्या सर्वशिक्षा अभियानातून करण्यात आले. या बांधकामाचा उर्वरित पाच टक्के निधी देण्यासाठी अभियंता थोरात याने शाळेचे मुख्याध्यापक जीवन सावंत यांच्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी तीन हजार रुपये तातडीने आणून देण्यास थोरातने सांगितले होते. त्यानंतर सावंत यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजता या विभागाने पंचायत समितीच्या सर्वशिक्षा अभियानाच्या गटसाधन केंद्रावर सापळा लावला व थोरात याला तीन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुपारी त्याच्या सांगलीत वारणालीतील घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली, पण काहीच सापडले नाही. त्याला रविवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)आदर्श शिक्षकाचा खरा आदर्श!जीवन सावंत यांना आतापर्यंत तालुका आणि जिल्हा पातळीवर ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ते ग्रामीण कथाकार आहेत. त्यांच्यासह उज्ज्वला घोळवे या शिक्षिकेने लोकवर्गणी आणि पदरमोड करून डिजिटल शाळा निर्माण केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लाचेची मागणी करणाऱ्या थोरातला गजाआड करून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
आटपाडीत कनिष्ठ अभियंता जाळ्यात
By admin | Updated: April 30, 2016 00:40 IST