लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरातील आष्टा ते तासगाव मार्गावरील बेघरांसाठी राखीव जागा शर्तभंग झाल्यामुळे शासनाकडे हस्तांतरित झाली होती. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन ही जागा परत देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी भूखंड आठवडाभरात हस्तांतरित करु, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.
वीर कुदळे म्हणाले, २५ मार्च २०१९च्या आष्टा पालिकेच्या सभेत शहरातील भूमिहीन बेघरांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून देण्याचा प्रस्ताव दिला होता. कुदळे यांनी घरकुलासाठी राखीव असलेल्या पालिकेच्या मालकीचा गट क्रमांक ३६८ मधील सहा एकर सहा गुंठ्याचा भूखंड शासनाने शर्तभंग झाल्याकारणाने काढून घेतला होता. याबाबतचा सातबारा व फेरफार सभागृहात सादर केला. याठिकाणी भारत गॅस रिसोर्सेसचे गॅस स्टेशन उभा करण्याचा प्रस्ताव होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे लेखी तक्रार केली होती. महापूर पाहणी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन दिले होते. सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत भूमिहीन बेघरांना घरकुले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वीर कुदळे, वर्षा अवघडे, डॉ. सतीश बापट, दिलीप कुरणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांची भेट घेऊन जागेची मागणी केली होती. यामुळेच पालिकेला घरकुलासाठी पुन्हा जागा मिळाली आहे.