सांगली : आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारपासून (दि.१५) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सिटू इतर विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीने हा निर्णय जाहीर केला.
सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून जोखमीची कामे करून घेतली, पण त्याचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या सर्वेक्षणाचे कामही करून घेण्यात आले. आता घरोघरी जाऊन रॅपिड अँटिजन चाचण्या करण्याची जबाबदारीही टाकण्यात येत आहे. फुकट राबवून घेण्याचा अन्याय सहन करणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संप जाहीर केला.
अतिरिक्त मोबदला, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा स्वतंत्र मोबदला, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्ती, वेतनात भरीव वाढ या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी लालबावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या नेत्या मीना कोळी, सुरेखा जाधव, अंजू नदाफ, दीपाली होरे, शबाना आगा, लता जाधव, अनुपमा गौंड, हणमंत कोळी आदी उपस्थित होते. किसान सभेचे राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख, जिल्हा सचिव दिगंबर कांबळे यांनी संपाला पाठिंबा जाहीर केला.
चौकट
आज महापालिकेवर मोर्चा
महापालिका क्षेत्रातील आशा कार्यकर्त्या मंगळवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत. मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले जाईल.