सांगली : आशा, गटप्रवर्तक महिला कर्मचारी कोरोना संकटात जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत. गेल्या वर्षी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या विशेष अभियानाच्या सर्व्हेचे काम करून घेऊनही त्यांना योग्य मानधन दिले नाही. सध्याही काम १८ तासांपेक्षा जास्त करूनही त्यांना तेवढा मोबदला दिला जात नाही. याबाबत सरकारकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज, मंगळवारपासून सर्व आशा, गटप्रवर्तक कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
सिटूसह विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कृती समितीतर्फे या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या संपाबाबतचे निवेदन सोमवारी सर्व आशा, गटप्रवर्तक महिलांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनात म्हटले की, आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र, या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्व्हेचे कामही अतिरिक्त मोबदला न देता करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटिजन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकली आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप होत आहे.
आशा गटप्रवर्तक संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी व आयटक आशा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तकांना संघटित करून मंगळवारी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे ते लक्ष वेधून घेणार आहेत.
किसान सभेचे राज्य कोषाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख, जिल्हा सेक्रेटरी कॉ. दिंगबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका क्षेत्रातील आशा कर्मचारी महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत.