ओळ : शिराळा येथे नगरपंचायतीने तयार केलेल्या कृत्रिम तलावात नागरिकांनी गणेश विसर्जन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी गणेश विसर्जनासाठी शहरात ९ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मंगळवारी गणेशाेत्सवाच्या पाचव्या दिवसापासून येथे गणेश मूर्तीचे विसर्जन सुरू झाले आहे.
शहरात मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, सर्व नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने पाचव्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्याधिकारी पाटील म्हणाले की, शासन निर्णयानुसार आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम गेल्यावर्षीपासून हाती घेण्यात आला आहे. गतवर्षी पाचव्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत जवळपास १४०० गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले होते. कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन होऊन तयार झालेली माती नगरपंचायतीने तयार केलेल्या बगीच्यामध्ये वापरण्यात येते. यावर्षी गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना भेटवस्तू म्हणून निरंजन देण्यात येत आहे. शहरात मरिमी चौक, गणपती चौक, घुमटवस्ती, बिरोबा डोह, कासारगल्ली, लोहारगल्ली, श्रीराम कॉलनी, नवजीवन वसाहत, अण्णा भाऊ साठे समाज मंदिर अशा ९ ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि निर्माल्य एकत्र करण्यासाठी कुंड ठेवण्यात आले आहेत.
चौकट
लकी ड्रॉद्वारे बक्षीस
कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनासाठी नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून नगरसेविका सीमाताई कदम यांनी लकी ड्रॉ द्वारे बक्षीस व भेटवस्तू देऊ केल्या आहेत. माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ शिराळा- सुंदर शिराळा अंतर्गत हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी विशेष कष्ट घेत आहेत.