लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तडीपार असतानाही बंदी आदेश झुगारून मिरज शहरात फिरत असलेल्या एका संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. योगेश उर्फ भास्कर भारत झुरे (वय २८, रा.ढालगाव ता.कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव आहे. मिरज येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून, त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार, रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची माहिती घेत असता, एलसीबीच्या पथकाला संशयित झुरे हा मिरजेत फिरत असल्याची माहिती मिळाली. झुरे यास मिरज प्रांताधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी तडीपार केले आहे, तरीही तो मिरजेत वावरत होता. जिल्ह्यात येण्यासाठी पूर्व परवानगी घेतली नसल्याने, मिरज शहर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत सावंत, जितेंद्र जाधव, राजाराम मुळे, राजू शिरोळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.