कोकरूड : दोन वर्षांपूर्वी ऊसतोडणीसाठी घेतलेले चार लाख ५० हजार रुपये परत न दिल्याच्या कारणावरून गुलाब गणपती बीळ (रा. बाभूळदे, ता. शिंदखेडा, जिल्हा धुळे) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत शंकर बबनराव पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी कोकरूड पोलिसांत फिर्याद दिली होती.
शंकर पाटील (वय ४४, रा. कोकरूड, ता. शिराळा) यांनी गुलाब बीळ याच्याबरोबर ऊसतोडणीसाठी मजूर पुरवठा करण्याचा करार केला होता. याप्रमाणे शंकर पाटील यांनी बीळ याच्या बँक खात्यावर चार लाख ५० हजार रुपये रक्कम जमा केलेे होते. मात्र, बीळ याने कराराप्रमाणे ऊसतोड मजुरांचा पुरवठा केेला नाही. तसेच घेतलेली रक्कम परत केेेली नाही. बीळ त्याच्या गावी सापडत नसल्याने शंकर पाटील यांनी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी कोकरूड पोलिसांत तक्रार दिली होती. बीळ हा गेल्या सहा महिन्यांपासून कोकरूड पोलिसांनाही हुलकावणी देत होता. बुधवार, दि.११ रोजी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एम. एस. पांढरे, बी. एच. कुंभार, विशाल भोसले यांनी आरोपीस त्याच्या राहत्या घरातून अटक केली.