सांगली : मिरज तालुक्यातील दूधगाव येथे महावितरणने वीज बिल थकबाकी वसुलीसाठी आयोजित मेळाव्यात सहा शेतकऱ्यांनी साठेआठ लाख रुपये भरले आहेत. या शेतकऱ्यांना तत्काळ ५० टक्के वीज बिलामध्ये सवलतही देण्यात आली आहे.
कृषी धोरण २०२० बाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, या हेतूने महावितरणच्या पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. कृषी धोरण २०२० अंतर्गत शेतकऱ्यांनी शेतीपंपाची ५० टक्के मूळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के वीज बिल माफ होणार आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांशी हितगूज करून अंकुश नाळे यांनी शेतकऱ्यांना या धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले दुरूस्तीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर नाळे यांनी चुकीची आणि तफावत असलेली वीज बिलांची तत्काळ दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले. यावर शेतकरी संभाजी गावडे, कल्लाप्पा कोल्हापूरे, बापू वाडकर, अण्णा वाडकर, बाळासाहेब वाडकर, भालचंद्र मसुटगे या सहा शेतकऱ्यांनी मेळाव्यातच आठ लाख ५० हजार रुपयांचे शेतीपंपाचे थकीत वीज बिल भरले. त्याबद्दल या शेतकऱ्यांचा प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, सांगली ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी, दूधगावचे सरंपच विकास कदम, माळवाडीचे सरपंच सुभाष जाधव, सावळवाडीचे माजी सरपंच बापू कोळी, उपविभागीय अभिंयता कुमार चव्हाण, शाखा अभियंता विनायक पोतदार यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
चौकट
थकबाकी भरल्यास प्रोत्साहन रक्कम
अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर म्हणाले, जमा होणाऱ्या थकबाकीची प्रत्येकी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च होणार आहे. शिवाय ग्रामपंचायत, सहकारी पतसंस्था व महिला बचत गटांनी थकबाकी व चालू वीज देयके जमा केल्यास प्रोत्साहन रक्कम मिळणार असल्याचे सांगितले.