नेवरी : नेवरी (ता. कडेगाव) येथील वॉटर सप्लाय योजनेजवळ कोल्हापूर पध्दतीचा के. टी. विहीर बंधाऱ्याचा कागद शनिवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी फोडून पाण्याने भरलेल्या बंधाऱ्यातून पाणी वाया घालविले. बंधारा फोडल्याची बातमी दुसऱ्यादिवशी गावात समजताच देखभाल कमिटी व शेतकऱ्यांनी येरळा काठावर धाव घेतली. अज्ञाताविरुध्द नेवरी पोलीस औट पोस्टकडे तक्रार दाखल केली आहे. अज्ञाताविरुध्द पोलिसांनी कसून चौकशी करावी व त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. येरळा काठावर कोल्हापूर पध्दतीचा हा बंधारा मोठ्या क्षमतेने भरल्यास ५०० हेक्टर क्षेत्रापेक्षा ऊस क्षेत्र ओलिताखाली येत आहे. सध्या या बंधाऱ्यास नऊ प्लेट असून, सात प्लेटपर्यंत हा बंधारा भरला जातो. या बंधारा भरल्यास नेवरी, ननवरे मळा, भिकवडी खुर्द येथील ऊस शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. मध्यरात्री अज्ञातांनी सात ते आठ ठिकाणी कागद फाडून बंधाऱ्यातील पाणी वाया घालविल्याने देखभाल कमिटीने तब्बल एक ते दीड लाख रुपये खर्च केलेले वाया गेले आहेत. देखभाल कमिटीने याबाबत ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिकाऱ्यांनीही कायमच हा बंधारा भरण्यास विरोध दर्शविला होता. सांगली जिल्ह्याचे खासदार संजय पाटील, आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार अनिल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांना हा बंधारा भरण्याबाबत सूचना देऊनही अधिकाऱ्यांनी ऐकले नव्हते. हे पाणी संपले असते तर, हजारो एकर ऊस कोमेजून गेला असता. ही भीती शेतकऱ्यांच्यात असतानाच कोणीतरी खोडसाळपणे मध्यरात्री बंधारा फोडला. बंधारा फोडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने येरळा काठावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी देखभाल कमिटीचे अध्यक्ष युवराज महाडिक, उपाध्यक्ष जे. डी. महाडिक, गिरीश कुलकर्णी, एच. डी. महाडिक, किरण चव्हाण, शहाजीराव मोरे, हर्षद ननवरे, अनिल पवार, बापूराव महाडिक, माजी सरपंच संतोष महाडिक, भिकवडी गावचे मुरलीधर सावंत आदींसह शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची पाहणी करून पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी अज्ञाताविरोधात मोहीम राबवून योग्य ती कारवाई करावी तसेच ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान विचारात घेऊन पुन्हा बंधारा पाण्याने भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)पोलिसात तक्रार दाखल : चौकशी सुरूयाबाबत कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले, घडलेला प्रकार गंभीर आहे. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बंधारा फोडणाऱ्या अज्ञातांना शोधून काढू. ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे गुन्हेगारांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या खोडसाळ वृत्तीला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढू.
नेवरीत येरळेवरील बंधारा फोडला
By admin | Updated: November 30, 2015 01:16 IST