सांगली : जिल्ह्यातील ७१८ एस. टी. बसेसपैकी दहा ते तेरा वर्ष वापरलेल्या २५० बसेस आहेत. नवीन बसेसच नसल्यामुळे या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर? असा प्रश्न प्रवाशांना पडतो. गरिबांची लालपरी वाचविण्यासाठी शासन आणि एस. टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करणार आहेत की नाहीत, असा प्रश्नही प्रवाशांतून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील आगारांकडे सध्या ७१८ बसेस आहेत. त्यापैकी २५० बसेस दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या आहेत. नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेस दुरूस्त करून त्यातून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. कोरोनामुळे एस. टी. बसेसच्या दुरुस्तीला लागणारे साहित्यही महामंडळाला पुरवठादारांकडून वेळेवर मिळत नाही. या बसेसही रोज २०० ते ३०० किलोमीटर अंतर धावून येत आहेत. कधी रस्त्यातच बंद पडत आहेत, तर कधी गळक्या छतामुळे पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. एस. टी.च्या सांगली विभागाकडे २५० कालबाह्य बसेसची संख्या असताना, महामंडळाकडून तीन वर्षात लालपरी बसेस मिळालेल्या नाहीत.
कोट
शासन खासगी गाड्या दहा वर्षांनंतर स्क्रॅपमध्ये काढा म्हणते. पण, एस. टी. महामंडळाच्या ताब्यात बारा ते चौदा वर्षे वापरलेल्या बसेस धावत आहेत. या गळक्या आणि नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांबरोबरच चालक व वाहकांचेही हाल होत आहेत. याकडे शासन आणि एस. टी. महामंडळ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- महादेव पाटील, प्रवासी.
कोट
एस. टी. महामंडळ नेहमीच ग्रामीण भागावर अन्याय करत आहे. जुन्या, गळक्या बसेस ग्रामीण भागामध्ये धावत आहेत. या बसेसचा प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. याकडे एस. टी. महामंडळ गांभीर्याने लक्ष देणार आहे की नाही? एस. टी. महामंडळ आर्थिक अडचणीत असेल तर शासनाने बसेसच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे.
- प्रशांत जोशी, प्रवासी.
चौकट
साहित्य पुरवठादाराची चार कोटी थकबाकी
एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागाकडे ७१८ बसेस आहेत. या बसेसच्या देखभाल, दुरुस्तीसाठीही सध्या महामंडळाकडे पैसे नाहीत. बसेस दुरुस्तीसाठी पुरवठादाराकडून घेतलेल्या साहित्याची थकबाकी चार कोटी रुपये आहेत. ही थकबाकी संबंधितांना न दिल्यामुळे त्यांच्याकडून साहित्य पुरवठ्यासही काहीवेळा टाळाटाळ होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
साहित्य पुरवठादाराची चार कोटी रुपये थकबाकी आहे. संबंधितांचे पैसे देण्यासाठी एस. टी. महामंडळाकडे निधीची मागणी केली आहे. तसेच ऑईल, ग्रीस आणि अत्यावश्यक साहित्य बसविण्यासाठी एक कोटी दोन लाखांची तातडीने गरज आहे. या निधीची महामंडळाकडे मागणी केली असून, तो निधी चार दिवसात मिळण्याची शक्यता आहे.
- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभाग.