पलूस तहसील कार्यालय बसस्थानकापासून अंदाजे दोन किलोमीटरवर आहे. सामान्य नागरिकांना पायपीट करीत कार्यालयात जावे लागते. तेथे कार्यालयीन कामासाठी लागणारी पावती तिकिटे अथवा मुद्रांक उपलब्ध नाहीत, असे विक्रेत्यांकडून सांगितले जाते. नंतर जादा रकमेची मागणी करून संबंधित तिकीट अथवा मुद्रांक विक्रेत्यांकडून दिला जातो. संबंधित काम स्वतःकडूनच करण्याची अट घातली जाते अन्यथा संबंधित व्यक्तीला मुद्रांक मिळत नाही.
शासनाच्या आदेशानुसार संबंधित विक्रेत्याने उपलब्ध असणाऱ्या मुद्रांक साठ्याचा तपशील फलक लावणे बंधनकारक आहे. तसेच मुद्रांक शुल्कव्यतिरिक्त रक्कम घेऊ नये, अशी अटी असूनही एकही विक्रेता याची अंमलबजावणी करताना दिसत नाही. याबाबत तक्रार करण्यास गेले असता अडवणूक केली जाते. जिल्हा निबंधक व तहसीलदारांनी लक्ष घालून कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.