सांगली : यंदाच्या एप्रिलमध्ये सुट्ट्या अधिक असल्याने बँकांचे कामकाज केवळ १८ दिवसच चालणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे करताना ग्राहकांना सुट्ट्यांचा अंदाज घेऊन करावी लागणार आहेत.
यावेळी महावीर जयंती रविवारी आल्याने ती एक सुट्टी वजा झाली आहे. चार रविवारी, शनिवार गृहीत धरता एप्रिलमध्ये गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी यांच्या सुट्ट्या आहेत. याशिवाय गुड फ्रायडेची एक सुट्टी बँकांनी यापूूर्वीच घेतली आहे. त्यामुळे १२ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यातच आता ५० टक्के क्षमतेने विविध आस्थापना सुरू राहणार असल्याने बँकेच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होणार आहे.
सुट्ट्या व लॉकडाऊनचा विचार करता बँक ग्राहकांना महत्त्वाची कामे करताना अडचणी येऊ शकतात. आर्थिक व्यवहारांसाठी आता ऑनलाईनचा पर्याय असल्याने त्याचा अडथळा येणार नाही, तरीही पेन्शनधारक व ऑनलाईन व्यवहार करता न येणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष बँकेत जाऊनच व्यवहार करावे लागणार आहेत. बँकांमध्येही आता कोरोनाचे नियम लागू झाल्याने टप्प्याटप्प्याने ग्राहकांना बँकेत सोडणार असल्याने बँकेच्या कामासाठी ग्राहकांना अनेक तास वेटिंग करावे लागण्याची चिन्हे आहेत. रांगांमध्ये थांबून त्यांना त्यांची कामे करावी लागतील.