सांगली : जिल्हा परिषदेच्या आवारात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ४० लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कुडनूर, शेळकेवाडी, डफळापूर पाणीयोजनांच्या चौकशीसाठी संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय झाला.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम का रखडले आहे? याची विचारणा सदस्यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली होती. त्याची दखल घेत आजच्या स्थायी सभेत खर्चाला त्वरित मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मालकीची अनेक कालबाह्य वाहने लिलावाच्या प्रतीक्षेत आवारात इतस्तत: लावली आहेत, ती त्वरित हटविण्याचे आदेश कोरे यांनी दिले. लिलाव प्रक्रिया निश्चित होईपर्यंत अन्यत्र लावण्याची सूचना केली. जिल्हा परिषदेच्या विविध कामांचे ठेके घेताना ठेकेदार स्थळपाहणी अहवाल देतात, त्याऐवजी जीओ टॅगिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा योजनांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून नियमानुसार वेतन दिले जाते काय? याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले. ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीज बिलांवर लावलेला दंड व व्याज महावितरणने माफ करावा, असाही ठराव झाला.