फोटो ओळ : जत येथे प्राथमिक शिक्षक संघाकडून सभापती मनोज जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जनैनुद्दीन नदाफ, भारत क्षीरसागर, शिवाजीराव सावंत, भगवान वाघमोडे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णकल्याण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करावी. यासह तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने (शि. द) सभापती मनोज जगताप यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन पंचायत उपसमितीचे सभापती विष्णू चव्हाण यांंना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटलेे आहे, तालुक्यातील शिक्षकांचे सातवा वेतन आयोग पडताळणी कामी पाठपुरावा करावा, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषद शाळेची डागडुजी व शालेय परिसर स्वच्छ करुन मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना विद्युतीकरण व संरक्षक भिंत बांधून देण्यासाठी प्रयत्न करावेत, पंचायत समितीच्या माध्यमातून शाळा निर्जंतुकीकरण साहित्याचे (किट) शाळांना मिळावे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.
या संघटनेच्या सर्व मागण्यांचा विचार करून शक्य तेवढे सर्व प्रश्न निकालात काढून शिक्षक संघटनेला सहकार्य करु, असे आश्वासन उपसभापती विष्णू चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले.
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष जनैनुद्दीन नदाफ, तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर, शिवाजीराव सावंत, तालुका उपाध्यक्ष भगवान वाघमोडे, भालचंद्र गडदे, रावसाहेब वाघमोडे, तालुका सरचिटणीस गुंडा मुंजे, तालुका कार्याध्यक्ष तानाजी टेंगले यांच्या सह्या आहेत.