सांगली : ‘संघर्ष चालूच राहील... निर्धार अखंड राहील...!’ या प्रेरणादायी वाक्यासह चालविण्यात येणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. आज (बुधवार)पासून मंडप उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून शहरात ठिकठिकाणी संमेलनाच्या जाहिराती लावण्यात आल्याने वातावरण संमेलनमय झाले आहे. देशभरातील ख्यातनाम पुरोगामी विचारवंतांच्या सहवासात होणाऱ्या या संमेलनाची सांगलीकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. दि. १४ आणि १५ मे रोजी वैचारिक मंथन होणार आहेच, त्याचबरोबर सांगलीकरांना पुरोगामी साहित्य संग्रहित ठेवता यावे, याकरिता पुस्तकांची पंधराहून अधिक दालने उभारण्यात येणार आहेत. राज्यात पुरोगामी विचारांचा प्राधान्याने पुरस्कार करणारी भूमी म्हणून सांगलीची ओळख आहे. या सांगलीत दोन दिवस अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांच्या विचारांचे विचारधन वेचण्याची संधी सांगलीकरांना मिळणार आहे. दोन दिवस वैचारिक खाद्य सांगलीकरांना मिळणार आहेच, त्याचबरोबर पुस्तकरूपी वैचारिक खजिनाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रामुख्याने पुरोगामी विचार रुजविण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येणार आहे. संमेलनस्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्यु.च्या सभागृहात होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीला दोन दिवसांपासून चांगलाच वेग आला आहे. बुधवारी कार्यक्रमस्थळी डिजिटल फलक लावत मंडपाचे काम सुरु झाले आहे. संमेलनाच्या ठिकाणी भोजन कक्ष आणि पुस्तक कक्ष यासाठी दोन प्रशस्त मंडप उभारण्यात येणार आहेत. संमेलनाचा अवधी आता काही तासांवर येऊन ठेपला असल्याने कार्यकर्ते दिवस-रात्र एक करुन तयारीत मग्न असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)संमेलनाच्या अध्यक्षपदी परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे, तर ख्यातनाम भाषातज्ज्ञ डॉ. गणेशदेवी यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबरोबरच डॉ. तारा भवाळकर, डॉ. बाबूराव गुरव, प्रज्ञा दया पवार, डॉ. प्रदीप पाटकर, तुकडोजी महाराजांचे शिष्य सत्यपाल महाराज यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरणार आहे. मॅगसेसे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची उपस्थिती संमेलनाचे खास आकर्षण ठरणार आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ यासारख्या पुस्तकातून समाजाच्या दुखऱ्या नसेवर अचूक बोट ठेवणाऱ्या साईनाथ यांचे विचार ऐकण्याची संधी संमेलनाच्या माध्यमातून सांगलीकरांना मिळणार आहे.
‘अंनिस’च्या संमेलनाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 00:15 IST