लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत खराब रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्तेदुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे आमदार सुरेश खाडे यांच्या प्रतिमेस रस्त्यावरील खड्ड्यातील गढूळ पाण्याने प्रतीकात्मक अभिषेक घालण्यात आला.
मिरजेत शिवाजी रस्ता, बसस्थानक ते शास्त्री चौक रस्ता, मार्केट परिसरासह सर्वच रस्त्यांची पावसाने दुरवस्था झाली आहे. रस्त्यांसाठी शंभर कोटी मंजूर झाल्याची घोषणा सुरेश खाडे यांनी केली होती. मात्र, रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मिरज शहरातील रस्ते व इतर समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत गांधी चाैकात राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी आ. खाडेंच्या प्रतिमेस रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्याने अभिषेक घातला. खराब रस्ते व खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना शहरातील नागरिक व बाहेरून येणाऱ्या रुग्णाचे हाल सुरू आहेत. रस्त्यावरील लहान-मोठ्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत आहे. मिरजेच्या निष्क्रिय आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार यांनी केली. मिरज शहरात हॉटमिक्स रस्ते न झाल्यास, आ. खाडेंच्या कार्यालयासमोर व घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही प्रा. प्रमोद इनामदार यांनी दिला. आंदोलनात जिल्हा रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मन्सूर नदाफ, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वाजिद खतीब व कार्यकर्ते सहभागी होते. गढूळ पाण्याने आ. खाडे यांच्या प्रतिमेस अभिषेक घालून निषेधाच्या देण्यात आल्या.