अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते फारूक गवंडी यांना प्रा. प. रा. आर्डे व बाबूराव गुरव यांच्या हस्ते कराडे पुरस्काराने गौरविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते फारूक गवंडी यांना विजय काका कराडे स्मृती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कराडे यांच्या द्वितीय स्मृतीनिमित्त अंनिस, तासगाव व कराडे परिवाराच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. अंनिस वार्तापत्राचे सल्लागार संपादक प्रा. प. रा. आर्डे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. बाबूराव गुरव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, विज्ञानवादी कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून गवंडी यांच्याकडे पाहता येईल. समाजातील दुःख, वेदनेला प्रबोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून ते संवेदनशीलपणे सामोरे जातात. गरिबी परिस्थितीत शिक्षण पूर्ण करूनही सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.
प्रा. आर्डे यांनी गवंडी यांनी कर्ज काढून दुर्मीळ पुस्तके विकत घेतल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना गवंडी म्हणाले, अंनिसमुळेच जात, धर्म, लिंग या भेदापलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करण्याची प्रेरणा मिळाली. जीवनाचा प्रत्येक निर्णय वैज्ञानिक आणि विवेकवादी पद्धतीने घेतो.
कार्यक्रमाला डॉ. विजय जाधव, प्रा. वल्लभदास शेळके, वसुधा कराडे, बाबूराव जाधव, पांडुरंग जाधव, ज्योती पाटील, ॲड. भरत शाळगावकर, राहुल थोरात, अमर खोत, प्रा. वासुदेव गुरव, प्रताप घाटगे, डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.
----------
चौकट
पुरस्काराची रक्कम दिवंगत सर्पमित्राच्या कुटुंबाला
गवंडी यांनी पुरस्काराच्या १५००० रुपयांत स्वत:चे ५००० रुपये टाकून मृत सर्पमित्र संजय माळी यांच्या कुटुंबीयांना आणि अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांना मदत केली. पुरस्कार अंनिसचे ज्येष्ठ हितचिंतक नंदूकाका कराडे आणि कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीतील शहीद शेतकऱ्यांना समर्पित केला.