ऐन नवरात्रीत सांगलीमध्ये ‘महाहादगा’ रंगलाय. तो महायुतीत रंगलाय म्हणून ‘महाहादगा’ म्हणायचं. संजयकाका, राजूभाई शेट्टी, घोरपडे सरकार, जगतापसाहेब, संभाजीआप्पा, सुधीरकाका, पृथ्वीराजबाबा, बाबर भाऊ, महाडिक कंपनी (थोरले, धाकले आणि त्यांचे पिताश्री), नाईकसाहेब ही त्यातली प्रमुख मंडळी. (नीतातार्इंनी ठरवलंय, यंदाही फेर धरता आला नाही, तर कडेला थांबायचं, पण खिरापतीला मात्र हात पुढं करायचाच!) जयंतरावांनी हळूच त्यात दिनकरतात्या, श्रीनिवासराव, हिंदकेसरींचे भीमराव यांना घुसवण्यासाठी चाचपणी केली, पण संजयकाकांनी पप्पूशेठ, धनपालतात्या, गोपीचंद अशी ऐनवेळची मंडळी आधीच घुसवल्यानं रिंगण मोठं झालं होतं. अखेर जयंतरावांनी, आपली माणसं आत नाहीत म्हटल्यावर या रिंगणाच्या मागं थांबून हादगा सुरू करण्यासाठी काकांना डोळा घातला. आणि स्वत: पहिलं गाणं सुरू केलं... ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतंय पारावरी...जयंतराव आणि काकांचा कावा ओळखल्यानं राजूभार्इंनी संभाजीआप्पांचा हात घट्ट पकडला. काळजीत पडलेल्या नाईकसाहेबांना मात्र राजूभार्इंनी आपला हात सोडून भाजपचा हात धरायला सांगितलं. तिकडं जमलं नाही तर आम्ही आहोतच, असं कानात सांगितलं. फेर धरताना संभाजीआप्पा, राजूभाई, सुधीरकाका अशी मंडळीही सोबत आल्यानं काका हिरमुसले होते. जयंतरावांचं नमन संपताच त्यांनी सुरू केलं. संभाजीआप्पा, राजूभार्इंकडं तिरक्या नजरेनं बघत काका म्हणू लागले,श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं, असं कसं वेड माझ्या कपाळी आलं?राजूभार्इंनाही चेव चढला. ते जानकरांच्या भिडूंसोबत गायला लागले, एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू,दोन लिंबू झेलू बाई, तीन लिंबू झेलू...फेर धरून नाचून-नाचून आणि गाणी म्हणून सगळे दमले. मग खिरापतीकडं वळले. कुणाच्या डब्यात काय असंल, यावर विचार करकरून सगळे थकले. सगळ्यांचा डोळा मलईकडं होता, पण ती कुणी आणलीच नव्हती. उद्या परत हादग्याला जमायचं, असं ठरवून सगळे परतू लागले. तिकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही हादग्याचं नियोजन केलं होतं, पण खिरापत कुणी आणायची, गाणी म्हणण्याचा मान कुणाला द्यायचा हे काही ठरेना. शेवटी एकाच मैदानावर आपापला स्वतंत्र हादगा करायचा, असं ठरलं. काँग्रेसच्या फेरातनं राष्ट्रवादीकडं बघत पहिलं गाणं सुरू झालं...यादवराया राणी रूसून बसली कैसीसासूरवाशीण सून घरासी येईना कैसीसासूबाई गेल्या समजावयालाचला चला सूनबाई आपुल्या घरालाअर्धा संसार देते तुम्हालाअर्धा संसार नक्को मलामी नाही यायची तुमच्या घरालाहे ऐकून राष्ट्रवादीनंही सुरू केलं. जयंतरावांना सगळ्यांनी कोरस दिला,चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाईझिपऱ्या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाईत्यांचा आवाज ऐकून आबाही रिंगणात आले, पण एका सुरात गाणं म्हणणं कुणालाच जमेना... शेवटी उद्या तयारी करून यायचं ठरलं आणि सगळे पांगले.ताजा कलम : हादग्याला गर्दी होईना म्हटल्यावर मदनभाऊ आणि प्रतीकदादांनी दांडियाची टूम काढली. टिपऱ्या आणल्या. ऐनवेळी गडबड नको म्हणून सराव सुरू केला. दोघं दांडिया खेळू लागले... पण मध्ये बराच खंड पडल्यानं दोघांच्या टिपऱ्यांचा ताल जमेना. टिपरीला टिपरी लागेना. एकदोनदा तर भाऊंची टिपरी दादांच्या मनगटावर आदळली! मग पतंगरावांनी ढोल हातात घेतला, तर विशालदादांनी ड्रमसेट! अखेर त्या तालावर सराव रंगायला लागला...- श्रीनिवास नागे
ऐन नवरात्रीत महाहादगा--
By admin | Updated: September 25, 2014 21:43 IST